मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावर सहा फुटीचा लोखंडी तुकडा टाकून सिग्नलच्या कांचावर दगडफेक करणार्या एका तरुणाला काल सीएसटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. देवा सुखलाल कौल ऊर्फ अमर असे या 19 वर्षांच्या तरुणाचे नाव आहे.
अटकेनंतर त्याला आज दुपारी येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवा हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवाशी असून तो सध्या काळाघोडाजवळील फुटपाथवर राहून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून स्वत:चा उदरनिर्वाह करतो. सुरेंद्रकुमार राजकुमार शर्मा हे मध्य रेल्वेमध्ये कामाला आहेत. काल सायंकाळी चार वाजता ते सीएसटी वार्ड येथील पाँईटमन म्हणून काम करत होते. पावणेपाच वाजता त्यांच्या सीएसटी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर एक तरुण रेल्वेच्या तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेस धोका निर्माण होईल या उद्देशाने कर्नाक ब्रिजखाली, रेल्वे पोल क्रमांक सीएसटीएम 55 येथे अप स्लो रेल्वे ट्रकच्या एका बाजूला सहा फुटाचा लोखंडी तुकडा टाकत असल्याचे निदर्शनास आले. हा तुकडा टाकल्यानंतर त्याने रेल्वे मार्गातील सिग्नलच्या काचांवर दगड मारून ते फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी आरपीएफ पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. या माहितीनंतर आरपीएफ पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सीएसटी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले. ही माहिती त्याच्या मध्य प्रदेशात राहणारे वडिल सुखलाल कौल यांना देण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.