रेल्वे रूळावर आढळले तीन मृतदेह

0

जळगाव। तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा रेल्वेखाली येवून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडल्या. यात दोन जणांची ओळख पटली असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यासह रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. यातच कांचननगरातील युवकाच्या मृत्यूप्रकरणी मात्र नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कांचननगरातील युवकाचा मृत्यू
कांचन नगरातील अठरा वर्षीय नरेश राजेंद्र बाविस्कर या युवकाचा प्रजापत नगरातील डाऊन रेल्वे लाईनवरील खांबा क्रं. 421/1 ते421/33 दरम्यान शनिवारी सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे कांचननगर परिसरात खळबळ उडाली होती. नरेश हा कांचननगरात आई रंजनाबाई मोठा भाऊ उमेश यांच्यासोबत वास्तव्यास होता. शिक्षणासोबतच एका काचेच्या दुकानात काम करायचा. शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास नरेश हा मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला. रात्री चित्रपट सुटल्यानंतर तो मित्रांसोबतच असल्याने रात्री 12 वाजेच्या सुमारास घरी आला आणि लागलीच पुन्हा गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी बसला. नरेश हा रात्री 1.30 वाजेपर्यंत मित्रांमध्ये कट्ट्यावर बसून होता. दरम्यान, सकाळी नरेश हा घरी न आल्याने कुटूंबियांनी मित्रांना विचारपूस केली आणि रात्री 1.30 वाजता तो एकटा घराकडे जात असल्याचे दिसून आल्याचे सांगितले. यानंतर मोठा भाई उमेश व काका यांनी नरेशचा शोध घेण्यास सुरूवात केला. प्रजापत नगरातील रेल्वे खांबा क्रं. 421/1 ते421/33 दरम्यान नरेश हा मृृत अवस्थेत त्यांना आढळून आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. नरेश याला लागलीच जिल्हा रूग्णालयात नेण्यात येवून तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अखेर याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक एस.बी. सनस यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर नरेश हा सर्वांचा लाडका तर मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या पश्‍चात आई, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे. तर नरेश हा आईच्या पोटात असतांनाच वडीलांचा मृत्यू झाला होता.

रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू
शिरसोली रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेतून पडून 33 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तरूणाची ओळख पटली असून योगेश बळीराम बोरसे (वय-33 रा. हिराशिवाकॉलनी) असे मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, योगेश बोरसे हे कुटूंबियांसोबत हिराशिवाकॉलनी येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी मध्यरात्री मुंबई येथे काही कामानिमित्त जात असतांना शिरासोली रेल्वेलाईनवरील खांबा क्रं. 417/23 ते 417/25 दरम्यान त्यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी रेल्वेरूळावर मृतदेह आढळुन आल्यानंतर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केल्यानंतर हिराशिवाकॉलनी येथील योगेश बोरसे यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात उपस्टेशन प्रबंधक ए.बी.सणस यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसोली रेल्वेलाईनवरील घटना
तिसर्‍या घटनेत शिरसोली रेल्वेलाईनवर शनिवारी सकाळी 11.10 वाजेच्या सुमारास अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळुन आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरसोली रेल्वेलाईनवरील खांबा क्रं. 415/20 ते 415/22 दरम्यान शनिवारी सकाळी अनोळखी ईसमाचा रेल्वेखाली येवून मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पोलिसांना मृतदेह आढळून आला असून अद्याप त्या इसमाची ओळख पटलेली नाही. तर याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक डी.टी.तायडे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.