नेरूळ । जुईनगर से.22 येथे असलेल्या रेल्वे वसाहतीतील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचे रुपांतर मिनी जंगलात झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या उद्यानात काटेरी वनस्पती वाढल्याने प्रवेश करणेच अवघड झाले आहे. त्यामुळे उद्यान मद्यपींचा अड्डा झाले असल्याने प्रत्येक कोपर्यात बियरच्या बाटल्या आढळत आहे. उद्यानाला ’बाल-उद्यान’ नाव देण्यात आले असले तरी या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. झोपाळ्याला बसण्याची पट्टी तुटल्याने मुलांनी काठी बांधून झोका घेण्याची सोय केली आहे.
सुशोभिकरणाची मागणी
नवी मुंबईत जुईनगर येथे रेल्वे प्रशासनाने कर्मचार्यांना राहण्यासाठी रेल्वे वसाहत बांधून दिली आहे. येथे अधिकार्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहतात. आरबी 1 ते 4 पद्धतीच्या तीस इमारती बांधलेल्या आहेत. त्यात अंदाजे साहेशे कुटुंबे राहतात. या कुटुंबातील लोकांसाठी 1 जानेवारी 2007 साली मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता यु. पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली टी.आर. सोनी यांनी या उद्यानाची निर्मिती केली होती. मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता एस.के.जैन यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. परंतू गेली काही दिवसांपासून उद्यानाची दुरवस्था असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त करत उद्यान सुशोभित करण्याची मागणी केली आहे.
उद्यानात मुलांनी खेळावं कुठे?
घसरगुंडीच्या शिडीवर घाणेरडी कपडे तर घसरगुंडीवर काटेरी झुडप पडल्याने येथे खेळणे धोकादायक झाले आहे. लहान मुलांचा व्यायाम व्हावा म्हणून स्क़्युअर क्यूबवर बसवले आहे. परंतू जंगली झाड्यांच्या वेलींचा वेढा त्याला पडला आहे. या गैरपरिस्थितीचा फायदा घेत कचरा व प्लास्टिक पिशव्यांचा खच तेथे साचला आहे. त्यामुळे आता सुट्या संपल्या असल्या तरी संध्याकाळी खेळण्यासाठी उद्यानाची गरज येथील लहानमुलांसह नागरिकांना वाटत आहे.