जळगाव। शहरात नेहरू पुतळ्या जवळील गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वेस्थानक यादरम्यान होणार्या वाहतुक कोंडीवर उपाय काढण्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात या रस्त्याच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाने द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. सोमवार 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आज एक बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या समवेत शहराचे आमदार सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, रेल्वेचे कमर्शियल मॅनेजर अरुण कुमार आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील या विषयांवर झाली चर्चा
शहरातील नेहरू पुतळा चौक ते रेल्वेस्थानका दरम्यान वारंवार वाहतुकीची कोंड होणे, त्यातून रेल्वेस्थानकाजवळ खाजगी वाहने, प्रवासी वाहने, रिक्षा आदींची गर्दी होते. रेल्वे गाड्या येण्याच्या व जाण्याच्या वेळी ही गर्दी वाढुन अनेकदा वाद होतात. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याबाबत मनपा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. संभाव्य पर्यायी रस्त्याची जागेचा काही भाग हा रेल्वे हद्दीतून जातो त्यासंदर्भातील अडचणी दूर करणे तसेच तेथे पोलीस चौकी निर्माण करुन रहदारीचे नियमन करणे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
त्वरित अहवाल मागविला
या संदर्भात परिवहन कार्यालयाने या रस्त्यावरील रहदारीसंदर्भात अहवाल तयार करुन द्यावा, त्यानुसार संभाव्य पर्यायी रस्त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील जागा देण्यासंदर्भात शक्य तितक्या लवकर परवानगी मिळवावी, अशा सुचना जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार भोळे यांनी शहरातून रेल्वे स्थानक परिसरातील अन्य रहदारी समस्यांविषयीही प्रशासनाकडे माहिती दिली. त्यावरही उपाययोजना करुन परिसरातील रहिवाशांना सुरक्षितता व नागरी सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी निर्देश दिले.