रेल्वे स्थानकाला अवैध पार्किंगचा विळखा

0

भुसावळ। जंक्शन रेल्वे स्थानकाच्या दोन्हीकडील प्रवेशदारांजवळ अवैधपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे प्रवासी गाडी आली असता स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा वेळेस मार्गात वाहने उभी केली जात असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

प्रवाशांना सहन करावा लागतो त्रास
भुसावळ जंक्शन रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांच्या प्रवेशद्वारांजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे नातेवाईक वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे प्रवेशद्वारासमोर वाहने उभी केली जातात. तसचे प्रवेशद्वारातच फळविक्रेते ठाण मांडतात. त्यामुळे स्थानकात येणार्‍या तसेच स्थानकातून बाहेर पडणार्‍या रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याठिकाणी बाहेरच नो पार्किंगचा फलक देखील लावण्यात आला आहे. तसेच सुरक्षा रक्षक तैनात असतानाही त्यांच्या डोळ्यादेखत वाहनधारक याठिकाणी वाहने लावून जातात मात्र यावर सुरक्षा रक्षकांकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे रेल्वे स्थानकाला पडलेला अवैध पार्किंगचा विळखा काही सुटत नसल्याचे दिसून येते.