रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यावरुन ‘खाकी’त जुंपली

2

रेल्वे सुरक्षा बलाकडून सापत्न वागणूक

लोहमार्ग पोलीस निरिक्षकांची स्टेशन प्रबंधकांकडे तक्रार

जळगाव- शहरातील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यात सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यावरुन लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलात चांगलीच झुंपली आहे. गुन्ह्याच्या तपासाकामी तसेच विविध कामांसाठी फुटेज दाखविण्यासंदर्भात वारंवार लोहमार्ग पोलिसांचे लेखी मागितले जात असून लोहमार्ग पोलीस व जिल्हा पोलीस दलाला सापत्न वागणूक देणार्‍या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचार्‍याविरोधात लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे चिंतामण व्ही आहेर यांनी 11 रोजी स्टेशन प्रबंधकांकडे पत्राव्दारे 11 तक्रार केली आहे.

निवेदनानुसार, सीसीटीव्ही फुटेजचा डीस्प्ले व फुटेज सेवा डाटा कार्यालय हे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर स्वतंत्र अतित्वात असून त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान चोरी अथवा इतर कारणासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांकडून लोहमार्ग पोलिसांकडून फुटेज दाखविण्याबाबतचे पत्र आणण्याबाबति सांगितले जाते व फुटेज दाखविण्यासाठी टाळाटाळ केली जाते.

लोहमार्ग पोलिसांसोबतही असहकार
प्रवाशाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोहमार्ग पोलीस कर्मचारी स्वतः तक्रारदाराला घेवून कार्यालयात गेले असता रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी लोहमार्ग पोलिसांनाही लेखी तक्रार घेवू या तसेच फुटेज दाखविण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आणा, असे सांगून प्रवाशांप्रमाणेच लोहमार्ग पोलिसांनाही परत पाठवित असल्याचे पत्रात नमूद आहे.

जिल्हा पोलीस दलाचीही उपेक्षा
गुन्ह्याच्या तपासकामी, बेपत्ता इसम,आरोपीचा शोध कामी जिल्हा पोलीस दलाला रेल्वे स्थानकारील फुटेज महत्वाचे असते. मात्र जिल्हा पोलीस दलालाही लोहमार्ग पोलीस विभागाचे लेखी पत्र घेवून या असे सांगितले जावून त्यांचीही फुटेज दाखविण्याबाबत अडणवणूक केली जात आहे. तरी संबंधित प्रकरणाबाबत खुलासा करावा, यंत्रणा कोणासाठी व कशासाठी कार्यान्वित आहे, याचे उत्तर मिळावे, असे पोलीस निरिक्षक आहेर यांनी पत्रात नमूद केले असून सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याबाबत होणारा त्रास कमी करण्याची विनंती केली आहे.