नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नुकतेच रेल्वेला आपली स्थानके स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रेल्वेने नियम बदलून प्लॅटफॉर्मवर घाण पसरवणार्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत केवळ दंड वसूल करून संबंधित व्यक्तीला सोडले जात होते. रेल्वे ट्रॅक धूळमुक्त करण्यासाठी स्वतंत्र फ्लाइंग स्कॉड तयार करण्यात आले आहे. जे वेळोवेळी सप्राईज चेकिंग करेल. यासोबतच झोनच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या आदेशानंतर अनेक स्थानकांवरही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज कोट्यवधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान बरेच जण काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. काहीवेळा हे रॅपर्स जाणार्या गाड्यांच्या चाकांमध्येही अडकतात. त्यामुळे चाके जॅम होऊन अपघाताचा धोका वाढतो. यामुळे आता घाण करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे रुळाच्या बाजूला असणारे असलेल्या कारखान्यांनी रेल्वेच्या परिसरात घाण पसरवल्यास रेल्वे गुन्हा दाखल करणार आहे. अशांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांचे फोटो काढले जातील आणि व्हिडिओही बनवले जातील. जेणेकरून तो पुरावा म्हणून सादर करता येईल. रुळाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांसमोर घाण आढळून आल्यास त्यांच्याकडूनही रेल्वे दंड वसूल करण्यात येणार आहे.