भुसावळ। रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील केला साईडिंग तसेच डिआरएम कार्यालयात वाहनतळ करण्यात आलेली आहे. मात्र यासाठी वाहनधारकांकडून पैसे आकारले जात असून आपल्या नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी येणारे तसेच डिआरएम कार्यालयात कामानिमित्त येणार्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनतळाच्या नावाखाली हि लूट केली जात असून याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन ती तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी डॉ. नि.तु. पाटील व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी डिआरएम यादव यांना निवेदन देखील दिले आहे.
डीआरएम कार्यालयातही पैसे आकारणी
रेल्वे स्थानकावर दोन्ही बाजूने वाहनतळ उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रवासी आपली वाहने लावतात. असे असताना स्थानकाच्या उत्तरेकडे केला साईडींगजवळ मोकळ्या जागेवर देखील तिसरे वाहनतळास मंजूरी देण्यात आली असून आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी येणार्या नागरिकांना काही वेळेसाठी वाहन लावायचे असल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तात्पुतरते वाहन लावण्यासाठी दुसरी पर्यायी जागाच नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केल्यास रहदारीस अडथळा ठरतील. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबींकडे लक्ष देण्याची मागणी डॉ. नि.तु. पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात डॉ.पाटील यांनी डीआरएमसह रेल्वे मंत्र्यांकडे व्टिटरद्वारे माहिती दिली आहे.
तसेच काँग्रेसचे सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी देखील डिआरएम कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या वाहनतळासंदर्भात तक्रार केली असून त्यांनी डीआरएम यादव यांना निवेदन दिले आहे. याठिकाणी कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक काही कामानिमित्त आल्यास त्यांच्याकडूनही पैसे आकारले जातात. यातून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून रेल्वे प्रशासनाने हि आकारणी बंद करण्याची मागणी केली आहे.