जळगाव । बहिणीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या तरूणाच्या हातातील पंचवीस ग्रँम वजनाचे सोन्याचे ब्रॅसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तरूणाने लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शहरातील महेश प्रगती मंगल कार्यालयाजवळील रहिवासी जितेंद्र गोपीचंद वर्मा हा तरूण बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावर बहिणीला सोडण्यासाठी आला होता. बहिणीला रेल्वेत बसविल्यानंतर घरी परत निघण्याआधी जितेंद्र याने जवळच असलेल्या पाण्याच्या नळावर हात धुतले आणि तेथून पुन्हा घरी निघून गेला. घरी पोहोचताच आपल्या हातातील ब्रॅसलेट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच रेल्वेस्थानकाकडे धाव घेतली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ब्रॅसलेटचा शोध घेतला. परंतू, मिळून न आल्याने ते चोरीला गेल्याचे त्यांच्या आले. अखेर त्यांनी लोहमार्ग पोलिसांनी त्यांचे पंचवीस ग्रँम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दिली.
रिक्षाचे टायर, डिश चोरी
जळगाव। उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागील बाजूचे टायरसह डिश चोरून नेल्याची घटना शहरातील लक्ष्मीनगरात घडली असून याप्रकरणी रिक्षाचालकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रारी अर्ज दिला आहे. लक्ष्मीनगरातील रिक्षाचालका श्रीराम माधव मोराणकर यांनी त्यांची रिक्षा घराजवळ उभी केली होती. दरम्यान, या रिक्षाचे मागील बाजूचे दोन्ही टायर व डिश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत मोराणकर यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रारी अर्ज पोलिस ठाण्यात दिला आहे.
मिनी ट्रकची कारला धडक
जळगाव। शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून जात असलेल्या कारला मिनी ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. यानंतर मिनी ट्रकचालकास पकडून त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे समजते.
एमएच.19.सीएफ.2656 क्रमांकाची कार ही बुधवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यानाजवळून जात असताना मागून येणार्या मिनी ट्रक (एमएच.04.बी.जी.4062) ने भरधाव येऊन कारला कट मारत पूढील भागास धडक देऊन पळ काढला. कारचालकाने मिनीट्रकचालकाचा पाठलाग करून त्यास जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर गाठून त्यास पकडले. त्यानंतर चालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान, या अपघातात कारचे नुकसान झाले होते.
चिमुकला भाजला
जळगाव- गरम पाणी अंगावर पडल्याने एक दोन वर्षीय चिमुकला पन्नास टक्के भाजल्याची घटना बुधवारी चिंचोली येथे घडली. वैभव ज्ञानदेव गोपाळ असे भाजलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैभव गोपाळ या दोन वर्षीय चिमुकल्यावर बुधवारी दुपारी उकळते गरम पाणी अंगावर पडले. ही घटना कुटूंबियांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर चिमुकला पन्नास टक्के भाजल्याचे निषन्न झाले आहे. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दुचाकीच्या डिक्कीतून दोन मोबाईल लांबविले
जळगाव। बारावीच्या परिक्षेला बसण्यापूर्वी दोन विद्यार्थ्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. दोन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
बुधवारपासून बारावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. पहिला पेपर इंग्रजीचा होता. पेपर हा 11 ते 1 या दरम्यानात असल्यामुळे सागर हरीष दर्डा व हिमान्शू अनिल पाटील हे दोघं मित्र परिक्षा केंद्र असलेले रोझलँड विद्यालयातील सकाळी आले. परिक्षा केंद्राच्या आत जाण्याआधी दोघांनी त्यांच्या एमएच.19.सीएन.3006 क्रमांकाच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत दोघांनी ठेवले. त्यानंतर पेपरला बसण्यासाठी निघून गेले. दुपारी 1 वाजता पेपर संपल्यानंतर दोघं दुचाकीजवळ आल्यानंतर त्यांना डिक्की उघडी दिसली. त्यातील दोन्ही मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
अंगावर भिंती कोसळ्याने दोघे जखमी
जळगाव। अंगावर भिंत कोसळल्याने माय-लेक जखमी झाले असून दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत जिल्हा रूग्णालयात नोंद घेण्यात आली आहे. मोहाडी येथील उषा शाम मोरे (वय-30) व विलास शाम मोरे (वय-09) या दोघांच्या अंगावर भिंत कोसळली. यात दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.
महिला जळाली
जळगाव। मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथे विवाहित महिला 85 टक्के जळाल्याची घटना बुधवारी घडली. जमखी महिलेवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.निमखेडी येथील सोनाली ज्ञानदेव जगताप वय-25 हि विवाहित महिला बुधवारी जळाली. तिला लागलीच कुटूंबियांनी जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल केले असता ती 85 टक्के जळाल्याचे निषन्न झाले. रूग्णालयातील जळीत विभागात विवाहितेवर उपचार सुरू आहे.
रेल्वेत चढताना प्रवाश्याचा मोबाईल लंपास
जळगाव। रेल्वेत चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवाशी तरूणाचा महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तरूणाने लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शहरातील एक तरूण हा मलकापुर जाण्यासाठी सकाळी रेल्वेस्थानकावर आला. प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर त्यात चढण्यासाठी प्रवाश्यांनी गर्दी केली. त्यावेळी हा तरूण रेल्वेत चढत असताना त्याच्या खिशातून अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरून नेला. रेल्वेत चढल्यानंतर त्या तरूणाला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. बुधवारी सायंकाळी 5 वाजता तरूणाने जळगावात येऊन लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली आहे.