रेल्वे स्थानकासह गाड्यांमध्ये प्रवाशांकडून कोविड नियमांचे उल्लंघण
दंडात्मक कारवाईचे रेल्वेला अधिकारच नाही : धडक कारवाई करण्याची शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
भुसावळ : कोरोनाच्या अनुषंगाने सर्व रेल्वे गाड्या आरक्षीत धावत असून त्यात प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आले आहे मात्र असे असलेतरी प्रवाशांकडून नियमांना हरताळ फासली जात असल्याने अशा प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांची रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. आरक्षित रेल्वेगाड्या सुरू असल्याने इतर राज्यातील लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या प्रवाशांच्या मात्र ना तोंडाला ना मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे त्यामुळे कोरोना फैलाव जोमाने वाढत असल्याचे तक्रारीत प्रा.पाटील यांनी म्हटले आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मास्कचा विसर
कोरोनावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी कठोर पद्धतीनं करण्याचं काम रेल्वे प्रशासनाने करावे, अशी मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल, महाव्यवस्थापक संजीव मित्तल, डीआरएम विवेककुमार गुप्ता व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे. भुसावळ रेल्वे स्थानक परीसरात काही प्रवासी ‘विना मास्क’ वावरताना आढळत असून काही रेल्वे कर्मचार्यांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून आल्याचे प्रा.पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. अनेक गाड्यातून प्रवास करणार्या काही प्रवाशांच्या बाबतीतही वेगळी गत नाही.
रेल्वे प्रशासनाला कारवाईचे अधिकार नसल्याची अडचण
शहरात कोविड नियमांचे उल्लंघण करणार्या पालिका व पोलिस प्रशासनाकडून धडक मोहिम राबवून दंडात्मक कारवाई केली जात आहे मात्र केंद्राच्या अखत्यारीत येणार्या रेल्वे प्रशासनाला नियम मोडणार्या प्रवाशांवर कारवाई करता येत नसल्याने प्रवाशांचे फावले आहे शिवाय त्यामुळे कोरोनाचा जोमात फैलाव सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाशी चर्चा करणार : मुख्याधिकारी
शहरात पालिका पथकाकडून कोविड नियमांचे उल्लंघण करणार्यांवर कारवाई केली जात आहे मात्र रेल्वे स्थानकावर अद्याप पालिका पथकाने कारवाई केलेली नाही. या संदर्भात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची भेट घेवून कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.
कारवाईचे अधिकार नाही मात्र प्रभावी जनजागृती : डीआरएम
डीआरएम विवेककुमार गुप्ता म्हणाले की, रेल्वे प्रशासनाला कोविड नियमांचे उल्लंघण करणार्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार नसल्याने उद्घोषणा करून वारंवार प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते शिवाय कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली जाते, असेही डीआरएम विवेककुमार गुप्ता म्हणाले.