मुंबई । मुंबई महापालिका पावसाळ्यात रेल्वे हद्दीतील नालेसफाईच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाला दरवर्षी अडीच कोटी रुपये देते. तसेच पालिकेला रेल्वे हद्दीत कोणतेही काम करायचे असल्यास रेल्वेच्या परवानगीशिवाय करता येत नाही. आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या मध्य व पश्चिम मार्गाच्या हद्दीत असलेल्या कल्व्हर्टचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, त्याचा संपूर्ण खर्च हा रेल्वेने करणे अपेक्षित असताना रेल्वे प्रशासनाने हा खर्च पालिकेच्या माथी टाकला आहे. एवढेच नव्हे तर या कामासाठी पालिकेने रेल्वेला आगाऊ स्वरूपात निधी देण्याची अट घातली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र, रेल्वेच्या या अरेरावीचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुंबई महानगरपालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यासाठी रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई रेल्वे प्रशासनाकडून करवून घेते. त्यासाठी दरवर्षी रेल्वेला किमान अडीच कोटी रुपये देण्यात येतात. मात्र, या नालेसफाईच्या कामांचा व त्यासाठी पालिकेकडून घेतलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या निधीचाही हिशोब रेल्वे प्रशासन हे पालिकेला देत नाही तसेच पालिका प्रशासनही रेल्वेकडे या नालेसफाई कामांचा त्यासाठी खर्चलेल्या निधीचा हिशोब कधीही मागत नाही. त्याबाबत कोणतीही माहिती स्थायी समितीच्या बैठकीत दिली जात नाही. दरम्यान, या प्रस्तावात पालिका रेल्वेला किती निधी देणार आहे, किती कल्व्हर्टची कामे करण्यात येणार आहेत, याबाबतची माहितीही देण्यात आलेली नाही.