चंदीगढ-हरयाणातील रेवाडी येथील सीबीएसई परीक्षेत टॉपर असलेली आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित १९ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ५ दिवसापूर्वी घडली होती. अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने पीडितेच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त होत आहे. काही अधिकारी आमच्याकडे आर्थिक मदत म्हणून चेक घेऊन आले होते. मात्र आम्हाला आर्थिक मदत नको असून आम्हाला न्याय हवा आहे पीडितेच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत नाकारली.
५ दिवस झाले तरी अद्याप आरोपींना अटक नाही, आम्हाला कोणतीही मदत नको अशा शब्दात पीडितेच्या आईने नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी हा सैन्यातील जवान असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी भारतीय सैन्याशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात आले आहे.
रेवाडी बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणी ही सीबीएसई टॉपर असून कोचिंग क्लासला जात असताना नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणी सीबीएसईमध्ये २०१५ रोजी हरयाणा विभागात पहिली आली होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. सध्या ती पुढील शिक्षण घेत होती.
रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी हा सैन्यातील जवान असून तो सध्या राजस्थानमध्ये तैनात असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपींचा शोध सुरु असून प्रमुख आरोपी लष्करी जवान असल्याने पोलिसांनी आता सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये देण्याची घोषणाही हरयाणा सरकारने केली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला आहे.