रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी ट्रक केला जप्त

Bhusawal market police seized a truck on suspicion of selling ration grains in the black market भुसावळ : रेशनचे स्वस्त धान्य काळ्यात बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी शहरातील हिरा हॉलजवळून तांदळाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक जप्त ताब्यात घेत चालकासह दोघांना चौकशीकामी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले आहे. सोमवार, 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधील तांदुळ रेशनचा आहे वा नाही? या संदर्भात तपास करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र दिले मात्र पुरवठा विभागाने हा तांदूळ रेशनचा हा आहे वा नाही? हे सांगता येत नाही, असे पत्र दिल्याने या प्रकरणातील ट्विस्ट वाढले आहे तर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पुरवठा विभागाच्या भूमिकेनंतर पोलिसांच्या कारवाईकडे लागले लक्ष
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील हॉटेल हिरा हॉलजवळून ट्रक (एम.एच.19 सी.वाय.1514) ताब्यात घेतला. या ट्रकमधे तांदूळ भरलेला असून हा तांदूळ रेशनचा आहे की नाही या संदर्भात खातरजमा करून पुढील कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी तहसील विभागातील पुरवठा प्रशासनाला पत्र दिले होते मात्र पुरवठा विभागाने तांदूळ रेशनचा आहे किंवा नाही हे सांगता येत नाही? असे पत्र दिले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

खातरजमा करून कारवाईची दिशा ठरणार : पोलिस उपअधीक्षक
बाजारपेठ पोलिसांना स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ट्रक ताब्यात घेतला मात्र पुरवठा विभागाने रेशनचा तांदूळ आहे वा नाही हे सांगता येत नसल्याचे लेखी पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे त्यामुळे तूर्त आम्ही हे धान्य नेमके कुठून आले, कुठे जात होते याची माहिती घेत आहोत शिवाय त्याबाबत बिले तपासत असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

रेशनचे रॅकेट सक्रिय
यापूर्वी शहर पोलिसांनी ट्रकद्वारे रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना पाठलाग करून पकडला होता व गुन्हादेखील या प्रकरणी दाखल करण्यात आला होता. भुसावळ शहर व परीसरात स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेट सक्रिय असून जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.