रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित

0

अमळनेर । शासनाने अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांचे मोफत धान्य गेल्या 8 ते 10 महिन्यापासून बंद केल्याने 80 वर्षावरील वृद्ध निराधार होण्याची वेळ आली आहे. उर्वरित केशरी कार्डधारकांना 3 वर्षापासून धान्यच नसल्याने कुचकामी ठरली आहेत. शासनातर्फे अन्नपूर्णा योजनेंतर्गत 80 वर्षाच्या वरील व निराधार वृद्धांसाठी त्यांच्याकडून कोणतेही काम होऊ शकत नसल्याने 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्याची योजना अंमलात आणली होती. मात्र गेल्या 8 ते 10 महिन्यापासून वृद्धांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्यच मिळत नाही. त्यामुळे वृद्धांचा शासनाने आधारही काढून घेतल्याने ते खर्‍या अर्थाने निराधार झाले आहेत.

अधिकच्या दराने करावी लागत आहे खरेदी
तालुक्यात 230 कार्ड धारक अन्नपूर्णा पासून वंचित झाले आहेत. अन्नसुरक्षा योजना लागू झाल्याने 59 हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचा प्राधान्य कुटुंब योजनेत सहभागी करून त्यांना स्वस्त धान्यचा लाभ देण्यात येत आहे. मात्र 60 हजार ते 1 लाख उत्पन्न घेणारे केशरी कार्ड 18467 आहेत. त्यांना उर्वरित केशरी कार्ड धारक म्हणून टाकण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षापासून म्हणजे फेब्रुवारी 2014 पासून त्यांना धान्यचा लाभ मिळत नसल्याने केशरी कार्ड शिधा पत्रिका नसून निरूपयोगी ठरल्या आहेत. पांढर्‍या पत्रिका आणि उर्वरित केशरी यांच्यात रंगा व्यतिरिक्त कोणताच फरक राहिला नाही. शासनाने बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांना 900 ग्राम साखर देऊ केली आहे मात्र त्याचे दर साडे 13 रुपयांवरून 15 रुपये व 15 वरून 20 रुपये केल्याने गरीबांना आर्थिक फटका बसत आहे. दुर्बल घटकातील नागरिकांना अधिकचे पैसे खर्च करुन बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे गरीबांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे दारिद्य्ररेषेखालील नागरिकांचे हाल होत आहे.