नवी दिल्ली – कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट करत तसा निर्णय जारी केला आहे.
अद्यापही कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट सूचना देत नाही तोपर्यंत त्याच्या वाट्याचे रेशन सर्वांना द्यावे लागणार आहे. तसेच आधार क्रमांक नसल्यामुळे कोणाचेही रेशन कार्ड रद्द होणार नसल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.