जळगाव प्रतिनिधी । रेशन दुकानदारांनी शासनाविरूध्द संघर्षाचा पवित्रा घेत दिल्ली येथे जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती येथील बैठकीत जाहीर करण्यात आली.
राज्य शासनाने रेशन दुकानावरील धान्य ऐवजी रोख सबसिडी (डीबीटी) संदर्भात अलीकडेच काढलेला अध्यादेश हा स्वस्त धान्य दुकानदारांवर गदा आणणारा असल्याने त्याविरोधात लढा देण्याचा ठराव जिल्हा पत्रकार संघात झालेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. याविरोधात २५ सप्टेंबरला दिल्ली येथे होणार्या जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचाही निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी महासंघाच्या चंद्रकांत यादव (कोल्हापूर) व राजेश अंबुस्कर (मलकापूर) या पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या काळ्या आदेशामुळे रेशन दुकानदारांवर येवू घातलेल्या गंभीर संकटाबाबत रेशन दुकानदारांनी संघटित होवून सनदशीर मार्गाने तीव्र लढा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष जमनादास भाटिया यांनी रेशन दुकानदारांवरील अन्याय धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी महासंघाचे सुरेश पाटील (अमरावती), जगन्नाथ खैरनार (नाशिक), योगराज गडाळे (गोंदिया), भागवत पाटील, सुनील अंभोरे (भुसावळ), भाईदास पाटील, गुलाबराव नांद्रे (धुळे)आदी उपस्थित होते.