जळगाव । रेशन दुकानदारांना 100 पोते देण्यात येवून 50 हजार रूपये दरमहा मिळायला हवे, तसेच रेशन दुकानदारांना शासनात सामावून घेऊन 40 ते 50 हजार रूपये मानधन देण्यात यावे अशा आदी मागण्यांसाठी 1 ऑगस्ट पासून राज्यभरातील रेशनिंग दुकानदर संप पुकारण्यात आला असून या संप काळात एक ही दुकानदाराने माल उचलायचा नाही असा ठराव शनिवारी शहरातील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या रेशनिंग फेडरशेनच्या राज्य कार्यकारिणींच्या राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष गजानन बाबर यांनी जाहीर केला.
यांचा होता सहभाग
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स व हॉकर्स परवानाधारक संघटना फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक जिल्हा पत्रकार संघात अध्यक्ष गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खजिनदार विजर गुप्ता, जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाणे, उपाध्यक्ष जमनादास भाटीया, नाशिक विभागीय उपाध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, कापसे, तोडकरी, ए.के.खान, एडके, संजर देशमुख, जगन्नाथ धोटे, अण्णाजी शेटे, देवीदास देसाई, शहाजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस वडाचे झाडाला पाणी घालून बैठकीस सुरूवात करण्यात आली. स्वागतगीत अरूण नेवे यांनी म्हटले.
सरकारला वेठीस धरु
रेशन दुकानदार हे शेवटच्या घटका मोजत आहे. आता स्पष्ट बोलण्याची वेळ आली असून रेशन दुकानदार जी सेवा करतो त्याचा मोबदला मागतो हा गुन्हा नाही. दुकानदारांना पैसे न देता परमीट मिळाले पाहिजे, सरकारला वेठीस आणण्याची वेळ आली आहे. शासनाच्या विरूध्द लढा उभारल्या शवाय न्याय मिळणार नाही. आता पैशांसाठी नाही तर जगण्यासाठी काम करण्याची वेळ आली असल्याचे मत बैठकीत गजानन बाबर यांनी स्पष्ट केले.
न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा
प्रास्ताविकात उपाध्यक्ष जमनादास भाटीया म्हणाले की, राज्यभरात 55 हजार रेशन दुकानदार आहे. रेशन दुकानदारांचा मागण्यांसाठी तीन वर्षापासून संघटना लढा देत असून वेळोवेळी जिल्हाधिकारी, मंत्री यांना निवेदन देऊन मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र सरकारने पोकळ आश्वासन दिले. महाराष्ट्र सरकार बारबालांचा विचार करते परंतु रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासन वेळकाढूपणा करीत आहे. रेशन दुकानदार हा शासन व जनतेचा महत्वाचा दुवा असतांना देखील सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. संघटनेने 1 ऑगस्टपासून रेशन दुकानदारांचा राज्यस्तरीय बंदला जळगाव जिल्ह्याचा पाठिंबा आहे. रेशन दुकानदारांचा मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा उपाध्यक्ष जमनादास भाटीया यांनी बैठकीत दिला.