धुळे । रेशन दुकानावरील ग्राहकांना वितरीत करण्यात येणारे रॉकेल महामार्गा लगत वाहनात भरण्यासाठी गेले. मात्र याची खबर लागल्याने पेठ विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जावून केवळ ते रॉकेलच परत मिळविले नाही तर पोलीस बंदोबस्तात लाभार्थ्यांना वाटल्याने काळ्या बाजारात गेलेले रॉकेल परत लाभार्थ्यांकडे आले.याबाबत अधिक माहिती अशी की, देवपूरातील रेशन दुकान नं.56 च्या ग्राहकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आलेले 200 लिटर रॉकेल ग्राहकांना न देता वडजाईरोडवरील एका ट्रकमध्ये भरण्यासाठी नेले जात होते. दरम्यान, या घटनेची खबर मिळताच पेठ विभाग भाजपा मंडलाचे पदाधिकारी बंटी धात्रक, तुषार भागवत, शर्मा यांनी त्याठिकाणी जावून ट्रकमध्ये टाकण्यात येणारे रॉकेल रोखले.
स्थानिक नागरिकांचा विरोध करण्याचा प्रयत्न
यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे रॉकेल गोरगरीबांच्या हक्काचे असून त्याचा काळाबाजार होत असल्याने गुन्हा दाखल झाल्यास तुम्हालाही त्रास होईल. हे त्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांचा विरोध मावळला. त्यानंतर पदाधिकार्यांनी तेरॉकेल देवपूरातील रेशन दु.नं.56वर आणून ग्राहकांना देण्यास भाग पाडले. यावेळी काही गडबड होवू नये म्हणून देवपूर पोलिसांनीही दोन कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून खबरदारी घेतली. परिणामी, गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे रॉकेल मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात होते.