मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करून सर्व रास्त भाव धान्य दुकानात ई-पॉज यंत्रणेद्वारे धान्यवाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करावी तसेच अन्न नागरी पुरवठा विभागाचा सर्व डाटा साठविण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव स्वाती म्हसे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
आतापर्यंत 1 कोटी 47 लाख शिधापत्रिकांपैकी 1 कोटी 16 लाख शिधापत्रिकांचे आधार सिडिंग झाले आहे. उर्वरित शिधापत्रिकांचे आधार सिडिंग लवकरात लवकर करण्यात यावे. सर्वच योजनांसाठी आधार सिडिंगचा वापर करण्याबाबत विचार करण्यात यावा. ई-पॉज यंत्रणा नसलेल्या रेशनदुकानांमध्ये तातडीने ही यंत्रणा बसविण्यात यावी. विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील अन्न सुरक्षा योजनेत अद्याप समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांचाही लवकरात लवकर समावेश करावा, असेही त्यांनी सांगितले.