पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका धारकांना कमी धान्य देतात. तसेच शिधापत्रिका धारकांना दादागिरी व गुंडगिरीची भाषा करतात. अशा स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी, ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने केली आहे.
याबाबत पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सरकारने शिधापत्रिकेवर मिळणा-या धान्य कोट्यात कपात केली आहे. केरोसीन पुरवठा बंद केल्यामुळे अनेक दुकानदारांनी राजीनामे देऊन परिमंडळ अधिकार्यांच्या संगनमताने एका गावातील दुकान दुसर्या गावात चालविण्यास दिले आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रत्येक शिधापत्रिकेमागे एका व्यक्तीचा गहू, तांदूळ कमी दिले जाते.