रेश्मा मानेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

0

पुणे । लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणीत महाराष्ट्राच्या रेश्मा माने हिने हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंना मात देत पोलंड येथील ब्यादगोस्झकर्झ उपनगरात होणार्‍या 23 वषार्ंखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. निवडचाचणीत रेश्माने 63 किलो गटात पुजा देवी आणि मोनियास हरवले होते. कोल्हापूरमधील गंगावेश तालमीमध्ये विश्‍वास हारुगले आणि तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करणार्‍या रेश्माने नुकत्याच तायचुंग (चायनिज तैपई) येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. याशिवाय फिनलँडमधील टम्पेरे येथे 1 ते 6 ऑगस्टदरम्यान झालेल्या जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रेश्माने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

दिनेश गुंड यांची निवड
पोलंडमध्ये रंगणार्‍या जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या प्राध्यापक दिनेश गुंड यांची प्रथम श्रेणी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे तांत्रिक सचिव असलेल्या दिनेश गुंड यांनी याआधी आशियाई, जागतिक, विश्‍वचषक आणि ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्पर्धा अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.