भुसावळ । शहरातील रॉकेल विक्रेत्या हॉकर्स यांना गेल्या वर्षभरापासून रॉकेलचा अल्प कोटा दिला जात असल्याने त्यांचा मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्रेक झाला. आमचे लायसन्स परत घ्या मात्र कुटुंबियातील मुलांना शासकीय नोकरी द्या, आम्हाला मानधन द्या, अशी मागणी त्यांनी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. पुरवठा निरीक्षक एम.एफ.तडवी, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी रॉकेल विके्रत्या हॉकर्सची बैठक घेण्यात आली.
गॅस धारक नसलेल्या यादीमुळे संताप
3 ऑगस्ट रोजी पुरवठा निरीक्षक एम.एफ.तडवी यांनी घेतलेल्या बैठकीत हॉकर्स यांना गॅस नसलेल्या ग्राहकांची यादी त्वरीत या कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते व तसे न केल्यास यापुढे रॉकेल न देण्याची तंबी दिली होती. मुळातच 12 महिन्यांपासून कोटा कमी करण्यात आल्यामुळे हॉकर्सच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
विक्रेत्यांकडून याद्या मागितल्या
ज्या ग्राहकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना रॉकेल देण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत त्यामुळे गॅस ग्राहक नसलेल्या ग्राहकांची यादी हॉकर्सकडून प्रशासनाने मागितली आहे ती रॉकेल विक्रेत्यांकडून घेण्यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीतही सूचित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी दिली. बैठकीला नारायण धांडे, सुकदेव पवार, मुकुंदा निमसे, इकबाल कच्छी, सलीम दस्तगीर, मंगल तेली, सुभाष बेग, युसूफ हमीद, अमीन खान, दगडू परदेशी, ईस्माइल खान, नासीर, मो.हारून अ.गफूर, सरफराज यांच्यासह शेकडो हॉकर्स व विक्रेते उपस्थित होते.