रॉकेलसाठी आता हमीपत्र

0

पुणे : शिधापत्रिकेवर रॉकेल घेणार्‍या लाभार्थ्यांना यापुढे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे गॅस जोडणी नसल्याचे हे हमीपत्र असणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीने खोटे हमीपत्र दिल्यास त्यावर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले आहेत, अशी माहिती सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून अनेक कुटुंबांना गॅसची जोडणी दिल्यानंतर सरकाने रेशनकार्ड धारकांना दिल्या जाणार्‍या घरगुती वापराच्या निळ्या रॉकेलच्या वापरावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यांच्याकडे गॅस सिलेंडरची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांनाच रॉकेल देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गॅसची जोडणी असलेल्या कुटुंबांना रॉकेल न देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास पुरवठा विभागाने सुरूवात केली आहे. त्यासाठी पॉस मशिनवरुन रॉकेलचे वाटप सुरू केल्यानंतर आता गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेवूनच रॉकेलचे वाटप करण्याते आदेश पुरवठा विभागाने दिले आहे. तसेच हमीपत्र खोटे निघाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे कारंडे यांनी सांगितले.