टोरांटो । फ्रेंच ओपनसाठी वाईल्डकार्ड नाकारले गेलेल्या रशियाच्या मारिया शरापोव्हाला येत्या ऑगस्टमध्ये येथे होणार्या रॉजर्स चषक स्पर्धेसाठी वाईल्डकार्ड प्रवेश देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. आतापर्यंत तिला स्पर्धांत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. फ्रेंच ओपन स्पर्धा आयोजकांनी तिला वाईल्डकार्ड प्रवेश नाकारला होता. टेनिसमध्ये एकेकाळी दबदबा निर्माण केलेली मारिया शारापोव्हा येत्या जुलैमध्ये होणार्या विम्बल्डन स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टोरांटोमधील स्पर्धेसाठी तिला निमंत्रित करण्यात आले असून युएस ओपनसाठी ही सराव स्पर्धा म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे कॅनडाच्या युजीन बुचार्डने शरापोव्हाला ‘चीटर’ म्हणून संबोधत तिच्यावर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली होती. पण तिच्याच देशासाठी स्पर्धा आयोजकांनी शरापोव्हाला वाईल्डकार्ड प्रवेश दिला आहे. 15 महिन्यांच्या डोपिंग बंदीनंतर शरापोव्हाने गेल्या महिन्यात पुनरागमन केले होते.