रॉजर फेडरर-नदाल उपांत्य फेरीत आमनेसामने

0

न्यूयॉर्क । जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला रफाएल नदाल आणि तिसर्‍या स्थानी असलेला रॉजर फेडरर हे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला. 36 वर्षीय फेडररने यंदाच्या मोसमातील विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला आता 20व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे वेध लागले आहेत. 31 वर्षीय नदालने या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचे हे दहावे फ्रेंच ओपनचे जेतेपद होते. त्याने पंधरा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धा त्याने 2010 आणि 2013 मध्ये जिंकली आहे.

शारापोवा-सिमोना आमनेसामने
महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या सिमोना हॅलेपचा पहिल्याच फेरीत रशियाच्या मारिया शारापोवाविरुद्ध सामना होईल. मारियाला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने शारापोवावर 15 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर शारापोवाची ही पहिलीच ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल. शारापोवाने हॅलेपविरुद्धच्या सहाही लढती जिंकल्या आहेत.

पाचव्या मानांकित कॅरोलिना वॉझ्नियाकीची सलामीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होईल. दुसर्‍या फेरीत तिची लढत एकतेरीना माकारोवाविरुद्ध होण्याची शक्यता आहे. सहाव्या मानांकित अँजेलिक कर्बरची सलामीची लढत जपानच्या ओसाकाविरुद्ध होईल.चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोवाला स्पर्धेत अग्रमानांकन आहे. पहिल्या टप्प्यात तरी तिला फारशी अडचण येणार नाही.