रॉजर फेडरर, रफाल नदालची आगेकूच कायम

0

न्युयॉर्क । पाच वेळा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल कायम राखली आहे. अन्य लढतींमध्ये अव्वल मानांकित रफाल नदालने आपला फॉर्म कायम राखताना अर्जेटिनाच्या लियोनार्डो मेयरचे आव्हान तिसर्‍या फेरीत संपुष्टात आणले. नदालने चौथ्या फेरीत स्थान मिळवताना लियोनार्डो मेयरचा 6-7, 6-3, 6-1, 6-4 असा पराभव केला. या विजयासह नदालने लियोनार्डोविरुद्धचा आपल्या विजयी कामगिरीचा आलेख 4-0 असा उंचावला आहे.

स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी नदालला आया युके्रनच्या अ‍ॅलेक्सांद्र डोलगोपोलोव्हशी दोन हात करावे लागतील. या दोघांमध्ये आतापर्यत झालेल्या लढतींमध्ये नदालच्या विजयाचा आलेख 6-2 असा आहे. अन्य लढतींमध्ये फेडररने 31 वर्षीय फेलिसियानो लोपेझवर 6-3, 6-3, 7-5 असा सरळ विजय मिळवला. फेडररने लोपेझवर 13 सामन्यांमध्ये मिळवलेला सलग 13 वा विजय आहे. आता फेडररचा सामना फिलीप कोलश्‍वेरशी होईल. फेडररने फिलीपला 11 वेळा याआधी हरवलेले आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन लढतींमध्ये फ्रान्सेस टियाफो आणि मिखाईल युज्नीविरुद्धच्या सामन्यांमध्ये पाचव्या सेटपर्यंत खेळावे लागले होते. पण शनिवारी झालेल्या सामन्यात फेडररने लोपेझवर सहज विजय मिळवत 16 व्यांदा स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. जर्मनीच्या कोलश्‍वेरने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन 7-5,6-2, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या सहावे मानांकन मिळालेल्या डॉमिनीच थिएमने फ्रांसच्या एड्रियन मानरिनोला 7-5, 6-3, 6-4 असा पराभव करत मागील चार वर्षांमध्ये तिसर्‍यांदा चौथ्या फेरीत स्थान मिळवले. थिएमचा सामना अर्जेटिनाच्या जुआन डेल पात्रोशी होईल. जुआनने आव्हान कायम राखताना स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता अगुटवर 6-3, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.