पश्चिम महाराष्ट्र हळहळला
सांगली : शेठ-सावकारांना लुटून गरिबांची खळगी भरणारे, अन्यायाविरोधात पेटून उठणारे आणि त्यासाठी गुंडापुंडांच्या रक्ताचे पाट वाहणारे गरिबांचे रॉबिनहूड बापू बिरू वाटेगावकर नावाचे एक वादळ मंगळवारी शांत झाले. 25 वर्षे पोलिसांना हुलकावणी देत रानावनात आणि कृष्णा खोर्यात घोंगावणार्या या वादळाने वयाच्या 90 व्यावर्षी इस्लामपुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच नावाने अर्थात बापू बिरू वाटेगांवकर या नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला होता. गरिबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून 12 खून झाले. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले; पण ते हाती आले नाहीत. दरोडेखोर असले तरी गरिबांचा कैवारी आणि बोरगावचा ढाण्या वाघ म्हणूनही त्यांची ओळख होती.
अन् वाल्याचा वाल्मिकी झाला, कीर्तन करु लागला!
वाळवा तालुक्यातील बोरगावात बापूंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. अन्यायाविरोधात पेटून उठून कायदा हातात घेतल्याने गुन्हेगार ठरलेल्या वाटेगावकर यांनी कृष्णा खोर्यात गोरगरिबांवर अन्याय करणार्या खासगी सावकारांना तसेच महिलांवर अत्याचार करणार्या गुंडांना यमसदनीही धाडले होते. बोरगावातील गोरगरिबांना त्रास देणार्या आणि गावातील स्त्रियांची छेड काढणार्या शिंदे बंधुंना त्यांनी ठार मारले. गरिबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून 12 खून झाले. 25 वर्षांनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर मात्र बापूंचा ‘वाल्मिकी’ झाला. ते समाजसेवेकडे वळले. गावोगाव प्रवचने करू लागले. गरिबांवर अन्याय करु नका, परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नका, ही त्यांची प्रमुख शिकवण होती. त्यांना मानणारा समाजातील मोठा घटक त्यांचा भक्त झाला. अनेक माता-भगिनींचे ते भाऊ झाले.
शेवटपर्यंत होती प्रचंड दहशत!
बापूंच्या जाण्याने पश्चिम महाराष्ट्र हळहळला आहे. बोरगांव, रेठरे, हरणाक्ष, मसुचीवाडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. ही दहशत इतकी होती की, वाळवा तालुक्यातल्या लेकींना त्यांच्या सासरच्या मंडळीकडून अथवा इतर टग्या लोकांकडून त्रास देण्यात येत असेल तर तुमची तक्रार बापूकडे करणार असल्याचे नुसते सांगितले, तरी त्या लेकींच्या सासरची मंडळी किंवा त्रास देणारी मंडळी सुतासारखी सरळ होत असल्याची आठवण वाळवा तालुक्यातील अनेक नागरिक आजही सांगतात. त्यांच्या दहशतीचा वापर करून त्यांच्याच मुलाकडून खंडणी मागण्याचे काम सुरु केले. याची माहिती मिळताच बापू बिरूंनी स्वतःच्या मुलाला सुरुवातीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून स्वतःच्या हाताने संपविले होते.