चेन्नई । माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्शकपदी नेमणुक झाल्यावर संघासाठी सहयोगी स्टाफ नेमण्यावरून वाद रंगला आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्श्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने स्वत:हून शास्त्रीसाठी सहयोगी स्टाफ नेमला. मात्र, प्रशिक्शक या नात्याने सहयोगी स्टाफ निवडण्याची मागणी रवी शास्त्री यांनी केली आहे. आता या वादात भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंगनेही उडी मारली आहे. शास्त्री यांची पाठराखण करताना, सहयोगी स्टाफ निवडण्याचा अधिकार प्रशिक्शकांचा आहे, असे रॉबिन सिंगने सांगितले. सिंग यांनी 2007 ते 09 दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
बीसीसीआयने योग्य पद्धतीने प्रशिक्शकाची निवड केली का? या प्रश्नावर मात्र सिंग यांनी सावध उत्तर दिले. सिंग म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अधिकार नाही. यावेळी सिंग यांनी विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादावर भाष्य करण्यास नकार दिला. तामिळनाडू प्रिमीअर लीगमधील करायकुडी कलाई संघाचे मुख्य प्रशिक्शक म्हणून रॉबन सिंग यांची निवड झाली आहे.
तर कामात सहजता येते
ज्या लोकांबद्दल माहिती नसते त्यांच्यासोबत मी काम करत नाही. माहित असलेल्या लोकांसोबत मी काम करतो. ओळखीच्या लोकांसोबत काम करताना त्यात एक सहजता येते. अशा लोकांसोबत काम करताना तुम्ही एखादी योजना प्रभावीपणे अमलात आणू शकता.त्यामुळे सहयोगी स्टाफ प्रशिक्शकाला निवडू द्यावा, या मताचा असल्याचे राबिन सिंग म्हणाले. क्रिकेट असो की एखादी कंपनी प्रत्येक ठिकाणी ही पद्धत अवलंबवली जाते. कुठल्याही कंपनीचा मुख्याधिकारी किंवा व्यवस्थापन परिचीत लोकांची निवड करते अशी पुष्टी सिंग यांनी जोडली.