रोकडे गावातून साडेसहा लाखांचे दागिने लांबविले

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथे लग्नासाठी आलेल्या एकाच साडेसहा लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नात चोरट्यांनी साधली संधी
पंढरीनाथ गंगाराम पाटील (51, रा.गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव ह.मु., उल्हासनगर, जि.ठाणे) हे चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील धनराज उत्तम पाटील यांच्या घरी लग्नाच्या निमित्ताने रविवार, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आले होते. लग्न आटोपून ते धरणगाव तालुक्यातील एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे साडेसहा लाखाचे 270 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते. ते दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. दागिने शोधूनही न मिळाल्यानंतर पंढरीनाथ पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.