रोगराईला दूर ठेवण्यासाठी आनंदा मातेला बोहण

0

नंदुरबार । गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यानंतर पाऊस बरसला.आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. गरम थंड वातावरणाने आजार देखील बळावताना दिसतात.लहान मुलांमध्ये व मोठ्यांना देखील सर्दी,खोकला,ताप आणि पाण्यामुळे आजार वाढतात.आषाढी एकादशीला अजून चार दिवस बाकी आहेत.पंढरपूरहून वारकरी परतीच्या प्रवासात लागले कि पाऊस जोर धरतो अशी धारणा आहे.आषाढ महिना म्हटला म्हणजे रोगराईचा महिना म्हणून ओळखला जातो.रोगराईचा बाधा होऊ नये यासाठी मरीमातेला बोहण देण्याची प्रथा आहे.या महिन्यात दर शुक्रवारी व मंगळवारी बोहन दिले जाते.नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावर असलेल्या आनंदा मातेला बोहण देण्यासाठी महिलांची जणू झुंबळ उडत आहे.मातेला बोहण दिल्याने घरातील इडा पीडा टळते अशी श्रद्धा आहे.

प्रथा अजूनही सुरूच
बोकडांची पूजा करून वाजत गाजत,माते समोर आणला जातो.या ठिकाणी बळी देऊन याचा प्रसाद म्हणून घरातील सदस्य खात असतात.जग 21 व्या शतकात जात असले तरी परंपरानुसार चालत आलेल्या या प्रथा अजूनही सुरूच आहेत. मातेला बोहण दिल्यानं कोप कमी होत असल्याची श्रद्धा आहे.जिल्ह्यात आषाढ महिन्यात मंदिरात गर्दी असते. शुक्रवारी व मंगळवारी येथे नागरिकांची रेलचेल असते.मातेला बोहण दिल्यावर रोगराई वाढत नाही यासाठी भाविक मंदिरात माथा टेकत असतात.

कित्येक वर्षापासून प्रथा
त्यामुळे आषाढ महिन्यात मातेला बोहण देण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.नंदुरबार मध्ये कित्येक वर्षापासून ही प्रथा आहे.यानिमित्ताने नातेवाईक कुटुंबातील सदस्य एकत्र येतात.तसेच जिल्ह्यातून बाहेर स्थायिक व नातेवाईक मातेला बोहण देण्यासाठी येत असतात.दही,भात, गूळ, आणि लहान आकाराच्या पोळ्या मातेच्या समोर ठेवून साकडे घातले जाते. त्याच प्रमाणे काही समाजात या दिवसात बोकड मारून घाटा साजरा केला जातो.