रोजंदारी कर्मचार्‍यांवर ‘पुरवठा’ची धुरा

0

पुरवठा कार्यालयाला बाहेरून कुलूप; रोजंदारी कर्मचार्‍यांचा आत भोंगळ कारभार
आठवड्यांपासून पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयाला कुलूप अन् फोन बंद
जळगाव (जितेंद्र कोतवाल) जळगाव तालुका पुरवठा विभागांतर्गत रेशनदुकानदार आणि रेशनकार्डधारक यांच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पुरवठा तपासणी अधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांनी आपल्या कामकाज करणार्‍या विभागाला कुलूप लावून कोणता दौरा करताहेत हे कळेनासे झाले आहे. तालुक्यातील 6 लाख आणि शहरातील 4 लाख असे एकुण 10 लाख लोकसंख्येचा रेशनचा कारभार जळगाव तालुका पुरवठा विभागावर आहे. यातील काही मोजके नागरीक आपल्या रेशनबाबतच्या तक्रारी घेवून तहसील कार्यालयात येतात. मात्र अधिकारीच जर जागेवर नसतील तर त्यांनी कोणाकडे जावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तक्रारी संदर्भात पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही

निर्ढावलेले कर्मचारी, अधिकारी
तहसीलच्या पुरवठा शाखेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे निर्ढावलेले आहेत की त्यांना कुणाचीही पर्वा नाही. आजपर्यंत कोणत्याही अधिकार्‍याने त्यांच्यावर कारवाईची हिम्मत न दाखविल्याने या विभागातील गैरप्रकाराबाबत तक्रारी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना रेशन मिळत नसल्याने एकीकडे त्यांचे हाल होत असताना दुसरीकडे पुरवठा विभागाला त्याचे काहीअएक सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

पंटर, दलालांचा आवारात सुळसुळाट
सर्वसाधारणपणे नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी 35 रूपये व प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. आणि 15 ते 1 महिन्यात रेशनकार्ड तयार होवून लाभार्थ्यांच्या हातात मिळते. सुशिक्षीत नागरीकांने जर ही प्रक्रीया स्वत: केली तर त्याला दिलेल्या मुदतीत रेशनकार्ड कधीच मिळत नाही अशावेळी पुरवठा विभागात काम करणारे पंटर तथा दलाल अशा व्यक्तींना हेरून याच कामासाठी चिरीमिरी घेवून काम होते. अशा पंटरांना किंवा दलालांना चिरीमिरी मिळाली तर रेशनकार्डसाठी सकाळी आर्ज अन् सायंकाळी रेशनकार्ड हातात असा प्रकार होत आहे.

रोजंदारीचे कर्मचारी सांभाळतात कारभार
पुरवठा विभागाच्या आवारात रेशनकार्ड मिळावे यासाठी गरजू लाभार्थी गेल्या 8-10 दिवसांपासून रांगाच्या रांगा लागल्या आहेत. यात रेशनकार्डधारकांना रेशनकार्डबाबत तर रेशनदुकानदार आपले महिन्याचे चलन भरण्यासाठी गर्दी करत आहे. रेशनदुकानदारांच्या म्हणण्यानुसार आठवड्यापासून आम्ही चलन भरण्यासाठी येत आहे. मात्र पुरवठा तपासणी आधिकारी व पुरवठा निरीक्षक हे जागेवर नाहीत. तर पुरवठा विभागात आधिकारी नसतांना रोजंदारीवर लावले चार ते पाच कर्मचारी कारभार संभाळतात. पुरवठा विभागाच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून आत हेच रोजंदारीवर असलेले कर्मचारी अव्वल कारकून व शिपाईची कामे करतांना आढळून आले आहे.

रेशनदुकानादारांची दुकानदारी
रेशनदुकानदार यांच्या विरोधात दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहे. रेशनकार्डला आधार जोडणी नसल्यामुळे तुम्हाला धान्य मिळत नाही. यात गरीब नागरीक मिळेत ते कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. अशावेळी हाताच्या बोटाचा ठसा मिळता जुळता होत नसल्याची तक्रारी वाढतात. रेशनदुकानदार मात्र कार्डधारकांची अडचण न सोडविता मनमानी करत थेट त्यांना तहसील कार्यालयात पुरवठा विभागात तक्रार नोंदविण्यातचे सांगतात अन् इकडे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी जागेवरच नव्हते.