रोजंदारी व कंत्राटी कर्मचार्‍यांची भुसावळ पालिकेत निदर्शने

0

रोजंदारी कर्मचार्‍यांना समान काम-समान वेतन लागू करण्याची मागणी

भुसावळ- रोजंदारी व कंत्राटी तसेच हंगामी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम-समान वेतन यासह अन्य मागण्यांसाठी नगरपालिका वर्कर्स युनियनतर्फे गुरूवारी पालिकेच्या आवारात निदर्शने करण्यात आली. पालिकेत कार्यरत रोजंदारी व कंत्राटी कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
राज्य कर्मचारी समन्वय समितीने लागू केलेल्या कराराची अंमलबजावणी, चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचार्‍यांप्रमाणे शिपाई, वॉचमन, कामाठी, कुली यांच्या वारसांना नोकरी, लाड समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काची पदे त्वरीत भरावी, कामगारांच्या वाढीव पदांना मंजुरी, सुधारित आकृतीबंध तयार करावा, 27 मार्च 2000 पर्यंतच्या रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे, संवर्ग कर्मचार्‍यांची पदोन्नती समिती स्थापन करून अ व ब संवर्गातील रिक्त पदे क वर्गातून त्वरीत भरावी, राज्य संवर्गातील गट अ, ब मधील रिक्त जागा गट क मधील संवर्गातून पदोन्नतीने भराव्या, शासन निर्णयानुसार पालिका कर्मचारी व सफाई कर्मचार्‍यांना 12 व 24 वर्षाची कालबध्द पदोन्नती देण्यात यावी, ठेकेदारी कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन, अशंदायी पेंशन योजना रद्द करावी, 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचार्‍यांना पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, कर प्रशासकीय सेवेतील संवर्ग कर्मचार्‍यांची श्रेणी एक व दोन कमी करून त्यांना 8 हजारापर्यंत वेतनश्रेणी लागू करून ग्रेड पे 4 हजार 200 द्यावा, राज्य संवर्ग कर्मचार्‍यांसाठी जाचक असलेले बदली धोरण रद्द करून अ, ब व क संवर्गातील बदल्या प्राधिकरणामार्फत करण्यात याव्या, सफाई कामगार, पाणीपुरवठा व अग्नीशामक विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सुट्यांचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.

तर 27 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन
समन्वय समितीच्या करारानुसार विविध मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व नगरपालिका कामगार 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान पुन्हा आंदोलन करणार आहेत, अशी माहिती युनियनचे राजू खरारे, अख्तर खान, दिनेश अहिरे यांनी कळवले आहे. पालिका वर्कर्स युनियनने मांडेलेल्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा आहे.