रोजगारासाठी योग्य पात्रता महत्वाची- खराटे

0

जळगाव। महविद्यालयात विद्यार्थ्यांना घडविले जाते. त्यांच्यावर योग्य ते संस्कार घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्राध्यापक करीत असतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, रोजगाराभिमुख अभ्यास याचेही उत्तम ज्ञान व आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे. ज्या विषयात शिक्षण घेत आहोत त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान विकसित करा. विद्यार्थी रोजगार नाही याची ओरड करतात पण रोजगार आहेत त्यांना पात्र विद्यार्थी मिळत नाही त्यामुळे आपण रोजगारासाठी लागणारी पात्रता पूर्ण करायला हवी असे मत प्राचार्य प्रल्हाद खराटे यांनी जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे स्वागतप्रसंगी व्यक्त केले

सुविधांची दिली माहिती
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता, आत्मविश्वास, मेहनत करून वेळेवर योग्य निर्णय घेता यावेत. यामुळे तुमच्या यशाचे मार्ग नेहमी खुले राहतील. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, संगणक सुविधा, कौशल्य विकास कार्यशाळा, उत्कृष्ठ ग्रंथालय, संगीत, नृत्य, कला, मोव्ही क्लब, हॉर्स रायडिंग, जीम, बस सेवा आदी सोई सुविधांसोबत अभ्यासाकरिता अनुकूल असा परिसर आहे. यासोबतच या शैक्षणिक वर्षाची अभ्यासक्रम रूपरेषाही त्यांनी सांगितली.

विविध खेळांची प्रात्यक्षिके
यावेळी प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे बौद्धिक खेळ आयोजित करून त्यांना उत्साहित केले. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात पहिलाच दिवस असल्याने त्यांची सुरुवात आनंदीमय व्हावी. त्यासाठी शिक्षकांचा परिचय व विद्यार्थ्यांमधील आपसात परिचय करून घेण्यासाठी गमतीशीर पद्धतीचे वैयक्तिक व सामूहिक संघभावना निर्माण करणारे विविध खेळ घेण्यात आले. या प्रसंगी सूत्रसंचालन प्रा.पल्लवी भालेराव व आभार सोनल तिवारी यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी व बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते.