रोजगार उपलब्धीसाठी उद्योजकांनी पुढे यावे ; कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड

0

नवी मुंबई : कोकण विभागातील लघु व मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योगसंस्थांनी स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्घ करून द्यावेत, असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केले. कोकण विभाग उद्योग समन्वय समितीची बैठक बेलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. दौंड म्हणाले की, कोकण विभागात विविध प्रकारचे उद्योग आहेत. काही बंद पडलेले उद्योग पायाभूत सुविधा उपलब्ध असतांना नवउद्योजकांना देता येतील का ? किंवा आहे त्या सुविधांचा अन्य उद्योगांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो का ? याचाही विचार करावा. महाराष्ट्र शासनाने उद्योगाबाबत अनेक नवीन धोरणही निश्चित केली आहेत. त्याचा फायदा बंद असणाऱ्या अथवा सुरु असणाऱ्या उद्योजकांनी घेतला पाहिजे. यासाठी कोकण विभागस्तरावर लवकरच एक कार्यशाळा घेण्यात येईल. रोजगार क्षेत्रातील कामगारांना वैद्यकीय सुविधा, आग नियंत्रणासाठी अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत रस्ते, संपर्कासाठी दूरध्वनी सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक कार्यक्षमतेने काम करावे. मोठ्या उद्योग समुहांनी स्वत:ची अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करण्यावर भर द्यावा, असेही दौंड यांनी सांगितले. या बैठकीत कोकण विभागातील विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, ईएसआयचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी तसेच अन्य विभागातील शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.