रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0

महापौरांच्या हस्ते झाले उद्घाटन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्यावतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मंगळवारी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पिंपरी महापालिकेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवारी हा मेळावा पार पडला. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे कंपनीत असलेल्या रिक्त पदाबाबत मुलाखती घेण्यासाठी उपस्थित आहेत. या रोजगार मेळाव्यास मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व वैयक्तिक माहितीच्या प्रतीसह सकाळी नऊ वाजताच मेळाव्याच्या ठिकाणी हजेरी लावली आहे. या मेळाव्याला महापालिका हद्दीतील तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नाव-नोंदणी करण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली आहे.