रोजच्या वापरातील वस्तूंवरचा जीएसटी कमी होणार

0

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासूनच त्याची झळ सर्वसामान्यांना बस आहे. परंतु, एकीकडे सर्वकाही ठीक आहे असे म्हणणारे केंद्र सरकार हळूहळू जीएसटीत बदल करत आहे. ज्या वस्तूंवरचा कर हा 28 टक्के आहे तो कमी करण्याची मागणी व्यापारी, जनता आणि विरोधक या सगळ्यांकडून केली जात आहे. यामुळे 10 नोव्हेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत रोजच्या वापरातील वस्तूंवर असलेला जीएसटी कमी होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अनेक वस्तू महागल्या
1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करण्यात आला. त्यानंतर दर महिन्याला जीएसटी परिषदेची बैठक होते. आता या महिन्यात 10 तारखेला होणार्‍या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवर असलेला 28 टक्के जीएसटी कमी केला जाण्याबाबत चर्चा होणार आहे. हा कर 28 वरून 18 टक्क्यांवर येऊ शकतो. अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही चर्चा सकारात्मक ठरली तर अनेक महत्त्वाच्या वस्तूंवर असलेला जीएसटी कमी होऊ शकतो. सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. लघू आणि मध्यम उद्योजकांचेही यामुळे नुकसान होते आहे. मात्र आता प्लास्टिकच्या वस्तू, शँपू, हाताने तयार करण्यात आलेले फर्निचर या आणि अशा इतर अनेक वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता आहे.

या वस्तू होऊ शकतात स्वस्त
हाताने तयार करण्यात आलेले लाकडी फर्निचर, प्लास्टिकची उत्पादने, शॉवर बाथ, शँपू, सिंक, वॉश बेसिन, सीट आणि सीट कव्हर, इलेक्ट्रीक स्विच या आणि इतर अशा वस्तू ज्यांच्यावर 28 टक्के जीएसटी लादण्यात आला आहे, तो कमी करण्यावर 10 नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. ज्या उद्योगांना 28 टक्के जीएसटीचा फटका बसला आहे त्या सगळ्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या 28 टक्के असलेला जीएसटी जर 18 टक्क्यांवर आल्यास सर्वांनाच दिलासा मिळू शकतो.