रोजलँड सोसायटीचा केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभाग!

0

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारच्या ’स्वच्छ भारत मोहिमे’त सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी-चिंचवडमधील रोजलँड सोसायटीने ’आपले घर’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी येथील शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांच्या संकल्पनेतून एक लघुपटवजा व्हिडीओदेखील बनविण्यात आला आहे. पुढील 2 ऑक्टोबर, 2018 पर्यंत सोसायटीला झिरो गार्बेज करण्याचा संकल्प रोजलँडवासीयांनी केला आहे.

स्वच्छतेचे मानदंड
रोजलँड सोसायटीने स्वच्छतेचे मानदंड तयार करून ते अमलात आणले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोसायटीची स्वच्छतेप्रती आत्मियता पाहून जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त शहारातील कचरा वर्गीकरणाची मोहीम रोजलँड सोसायटीमधूनच सुरू केली. सोसायटी असो किंवा सोसायटीबाहेरचा परिसर असो; तो स्वच्छ ठेवणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे; आणि त्या जबाबदारीचे प्रत्येकाने पालन करायलाच हवे, असे त्या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे.

कचर्‍याचे केले वर्गीकरण
रोजलँड सोसायटीमध्ये कचरा व स्वच्छता मोहिमेबद्दल नेमकी कोणत्या पद्धतीने जनजागृती केली गेली, याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून सांगत कुठल्याही काल्पनिकतेचा आधार न घेता अगदी खरी-खुरी पात्रे घेऊन कशा पद्धतीने जनजागृती करण्यात आली, त्याबाबत संदेश देण्यात आला आहे. रोजलँड सोसायटीने कचर्‍याचे वर्गीकरण करण्यावर जोरदार भर दिला आहे. ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा अशा प्रकारे कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचर्‍याचे घरच्या घरीच कंपोस्ट खत बनविण्यात येते. पालापाचोळा किंवा नैसर्गिक सुका कचरा झाडांच्या बुंध्याला टाकून तसेच खतनिर्मिती करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. तर ई-कचरा कमिन्स इंडिया कंपनीला दिला जातो.

कचर्‍याचे प्रमाणे 30 ते 40 टक्क्यांनी घटले
स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे सध्या सोसायटीमधून जाणारा कचरा 30-40 टक्क्यांनी घटला आहे. 2 ऑक्टोबर, 2018 पर्यंत सोसायटीमधून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर जाऊ न देता सर्व कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे. रोजलँड सोसायटीने तयार केलेला व्हिडीओ https://www.youtube.com/watch?v=muUL6N0xKlg या लिंकवर क्लीक करून पाहता येऊ शकतो.