पालघर : रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व बुद्धिमत्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पालघर तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालघर तालुक्यातील 14 शाळांमधील इ. आठवी व नववीच्या 28 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या वक्तृत्वगुणांनी परीक्षकांना तसेच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संपदा काशीकर या स्पर्धाप्रमुख व स्वाती पाटील या सह स्पर्धाप्रमुख होत्या. व्यक्तिमत्व विकासास हातभार लावणार्या व विचारांना चालना देणार्या अशा स्पर्धा रोटरी क्लबने दरवर्षी आयोजित कराव्यात या विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीचे रोटरी क्लबचे अध्यक्ष निनाद सावे यांनी स्वागत केले व या स्पर्धा रोटरी क्लब दरवर्षी आयोजित करुन विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देईल याची ग्वाही दिली. या वेळी सचिव मिनल शहा, खजिनदार भूषण सावे, युथ डायरेक्टर संजय महाजन तसेच रोटरीचे सदस्य, शिक्षक, व पालघर मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी विजेत्यांना व विजेत्या शाळांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.