रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे नदी स्वच्छता अभियान उत्साहात

0

भारतीय नदी दिवसानिमित्त राबविले विविध उपक्रम

दोनशे सदस्यांची नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याची घेतली प्रतिज्ञा

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान रविवारी थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे उत्साहात पार पडले. या अभियानात भारतीय नदी दिवसानिमित्त निमित्त 200 लोकांनी पवना नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. नदीमधून सात ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जमलेल्या स्वयंसेवकांनी पवनामाईच्या पात्रातून जलपर्णी बाहेर काढली. नदीदिवसानिमित्त विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली.

सदस्यांनी केला वाढदिवस साजरा

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित आजचा जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई या अभियानाचा आज 265 वा दिवस होता. आजपर्यंत एकूण 1550 ट्रक जलपर्णी नदी पात्रातून बाहेर काढण्यात आली. अभियानात थरमॅक्स कंपनी व प्राज कंपनीची टिम व या नदीवर नेहमी काम करणारे शेकडो नदी प्रेमी सहभागी झाले. रोटरी क्लबचे सचिन खोले व प्रणाली सोमनाथ हरपुडे या सदस्यांनी आपले वाढदिवस संपुर्ण परिवारासह पवनामाईच्या घाटावर साजरा केला. या सदस्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश या अभियानासाठी दिला. त्यामुळे उपस्थित सर्व सदस्यांनी या दोघांचे मनःपुर्वक अभिनंदन केले.

एस.पी.वायर्सची टिम कार्यरत

मागील एक आठवड्यापासून भारतीय नदी दिवस निमित्त रानजाई प्रकल्प देहू व एस.पी.वायर्सची टिम नदी स्वच्छतेचे काम करत आहेत. अमृता विद्यालय निगडी मधील पाचवी ते दहावीचे 100 विद्यार्थी मंगळवार (दि. 27) व बुधवार (दि. 28) रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत तर क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल रावेत येथील विद्यार्थी संध्याकाळी केजुबाई बंधारा येथे नदीची व्यथा समजून घेण्यासाठी येणार आहेत. बुधवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत पवना नदीची आरती केजुबाई बंधारा येथे करण्यात येणार आहे. या आरतीने भारतीय नदी दिवसानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमांची सांगता होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जलदिंडी प्रतिष्ठान, भावसार व्हिजन, रानजाई प्रकल्प देहू आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन हे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी सोबत पवनामाईची आरती करणार आहोत.