रोटोमॅकचा कर्जघोटाळा 3 हजार 695 कोटींचा!

0

विक्रम कोठारी सीबीआयच्या जाळ्यात!

नवी दिल्ली : रोटोमॅक पेन या प्रसिद्ध कंपनीचा मालक विक्रम कोठारीने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. कोठारीने देशातील सात आघाडीच्या बँकांचे 3 हजार 695 कोटी रुपये बुडवल्याचे सीबीआय तपासातून उघड झाले आहे. विक्रम कोठारीचा घोटाळा 800 कोटींचा असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र, याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने सोमवारी संबंधित कागदपत्रांची छाननी केली असता हा घोटाळा 3 हजार 695 कोटींचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधींचा घोटाळ्याने संपुर्ण देश हादरला असताना, पेनची निर्मिती करणार्‍या रोटोमॅक कंपनीचा 800 कोटींचा घोटाळा उघड झाला. आता या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून 3 हजार 695 कोटींचा हा घोटाळा असल्याचे उघड झाल्याने बँकींगक्षेत्र कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सात बँकांकडून घेतले कर्ज
गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठारीसह पत्नी आणि मुलालाही सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रोटोमॅक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारीने अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून 800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कोठारीने व्याज किंवा कर्जाची रक्कमही परत केली नाही. नियम धाब्यावर बसवून कोठारीला कर्ज देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याने युनियन बँकेतून 485 कोटी, तर अलाहाबाद बँकेतून 352 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

कोठारीच्या घरावर छापेमारी
हा कर्जघोटाळा उघडकीस आल्यानंतर कोठारी अटक टाळण्यासाठी देशातून पसार झाल्याचे म्हटले होते. मात्र, मी कानपूरमध्येच असून, कुठेही पळालेलो नाही, असे कोठारीने स्पष्ट केले होते. सीबीआयने रविवारी मध्यरात्री एक वाजताच कोठारीच्या घरावर छापेमारी केली. तसेच कोठारीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्यासह पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले. या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.