भुसावळ। शाळा महाविद्यालयाच्या परिसरात शाळकरी विद्यार्थिनींसह महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणार्या 22 टवाळखोरांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने कारवाई करीत खाक्या दाखवल्याने शहरातील रोडरोमिओंच्या उरात चांगलीच धडक भरली. पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करीत सक्त ताकीद देऊन उभयतांची सुटका केली असलीतरी पुढच्या वेळी शाळा-महाविद्यालयांच्या परीसरात दिसल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा रोडरोमिओंना देत पालकांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंनी शाळकरी विद्यार्थिनींना त्रास देण्याच्या तक्रारी वाढल्याने शुक्रवारी कारवाई झाली.
या शाळा-महाविद्यालय परिसरात झाली कारवाई
शहरातील बी.झेड.उर्दू हायस्कूलच्या परीसरात काही तरुण टवाळखोरी करीत शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढत असल्याची तक्रार बाजारपेठ पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी खडका रोड परीसरातील बी.झेड.उर्दू हायस्कूल तसेच शिवाजी नगर परीसरातील डी.एल.हिंदी हायस्कूल तसेच यावल रस्त्यावरील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत रोमिओगिरी करणार्या 22 तरुणांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यापुढे हजर केले.
कारवाईत हवे सातत्य
शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी भुसावळ येथे शिक्षणासाठी येतात मात्र काही टवाळखोरांमुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बदनामीपोटी अनेक विद्यार्थिनी पोलीस ठाण्याची पायरीच चढत नाही त्यामुळे टवाळखोरांची हिंमत आणखीनच वाढते. पोलीस प्रशासनाने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक आवारासोबतच बसस्थानक, नाहाटा चौफुली, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान या भागात सातत्याने फिरत्या पथकाला पाठवून कारवाई केल्यास निश्चित अप्रिय प्रकारांना आळा बसणार आहे.
कारवाईने उरात भरली धडकी
शासकीय-निमशासकीय नोकरदारांसह विविध व्यवसाय करणार्या व्यावसायिकांच्या शहर हद्दतील चार तर बाजारपेठ हद्दीतील 18 तरुणांना पोलिसांनी कारवाईदरम्यान ताब्यात घेत पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शुक्रवारी आणले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करीत पहिला व अखेरचा गुन्हा म्हणून त्यांना ताकीद देण्यात आली. यापुढे कुठल्याही शाळा-महाविद्यालयांच्या आवारात टवाळगिरी करताना आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी सक्त ताकीद या रोडरोमिओंना त्यांच्या पालकांसमक्ष देण्यात आली. मुंबई पोलीस अॅक्ट 112, 117 अन्वये सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या कलमाखाली या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण फिरणार्या व रोमिओगिरी करणार्यांविरुद्ध पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे.
नीलोत्पल, सहाय्यक पोलीस अधीक्षक