माद्रिद : सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने चायनीज सुपर लीगमधील एका क्लबची वर्षाला दहा कोटी युरोची भरघोस ऑफर नाकारल्याची माहिती त्याचा एजंट जोर्गे मेंडेस याने दिली. रोनाल्डोला दर मोसमाला 104.6 दशलक्ष डॉलरची ऑफर होती. सध्या त्याला मिळत असलेल्या रकमेच्या तुलनेत हा आकडा पाच पटींनी जास्त आहे. रोनाल्डो 31 वर्षांचा असून, पोर्तुगालचा कर्णधार आहे. त्याच्यासाठी सरते वर्ष फलदायी ठरले. त्याला एकूण 264 दशलक्ष डॉलरची ऑफर होती.
शांघाय शेन्हुआ क्लबने अर्जेंटिनाचा स्ट्रायकर कार्लोस तेवेझ याला नुकतेच करारबद्ध केले. त्याला दोन वर्षांसाठी घेण्यात आले. आठवड्याला 720000 युरो (757102 डॉलर) इतकी रक्कम त्याला मिळेल. कराराची एकूण रक्कम 84 दशलक्ष युरो इतकी असल्याचे वृत्त आहे. तेवेझ 32 वर्षांचा आहे. तो जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉलपटू बनला. पॉल पोग्बा, गॅरेथ बेल, रोनाल्डो, गोंझालो हिग्युएन आणि नेमार हे पहिले पाच जण आहेत.
अलीकडेच चेल्सीकडून खेळणारा ब्राझीलचा मध्यरक्षक ऑस्कर शांघाय स्पीग क्लबकडे दाखल झाला. त्याला 71 दशलक्ष युरो रक्कम मिळाल्याचे वृत्त आहे. चायनीज सुपर लीगमध्ये दाखल झालेल्या मातब्बर खेळाडूंमध्ये पॉलीन्हो (गॉंगझू एव्हरग्रॅंडे), रिनाटो ऑगुस्टो (बीजिंग गुओअन), डेम्बा बा (शांघाय शेन्हुआ) आणि एझीकील लॅव्हेझ्झी (हेबेई चायना फॉर्च्युन) यांचा समावेश आहे. मेंडेस यांनी “स्काय स्पोर्टस’ला सांगितले, की रोनाल्डोला चिनी क्लबने अशी ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांची भूमिका समजू शकते, कारण त्यांना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू हवे आहेत.