धुळे । 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 43.39 लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर विभागांचा यात समावेश असणार आहे. या मोहिमेत रोपांच्या लागवडीबरोबरच रोपे जगविण्याचेही नियोजन सर्व विभागांनी करावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी जिल्ह्यातील वृक्ष लागवडीसाठीचे नियोजन व पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जागा उपलब्ध करुन द्यावी
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले, वृक्ष लागवड मोहीम राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यामुळे सहभागी प्रत्येक विभागाने गांभीर्याने या मोहिमेतील कामांची पूर्तता करावी. खड्डे खोदणे, त्यांची माहिती संगणकावर अपलोड करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण करुन अहवाल सादर करावा. तसेच येत्या दोन दिवसांत खड्डे खोदण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. महानगरपालिकेने शहरातील खुल्या भूखंडांवर वृक्षारोपण करुन त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील चारही पंचायत समित्यांनी सामाजिक वनीकरण विभागास वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपवनसंरक्षक जी.के. अनारसे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, सहाय्यक वनसंरक्षक रेवती कुळकर्णी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेचे प्रकल्पाधिकारी राजाराम हळपे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
नागरिकांनाही सहभागाची संधी
वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत हरीत सेनेमध्ये मोफत नाव नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी वनविभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणी करताना संपूर्ण नाव, जन्म तारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र असा तपशील भरुन देणे आवश्यक आहे. हरीत सेनेच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.