वृक्षरोपणावर लाखो रुपये खर्च
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. मोठ्या धामधुमीत गाजावाजा करत वृक्षरोपणाची सुरुवात केली जाते. खड्डे खोदले जातात, पुरवठादारांकडून रोपे, लालमाती खरेदी केली जाते. यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, त्याची फलनिष्पती नसते. गेल्या 25 वर्षातील रोपे खरेदीची संख्या आणि लागवडीची संख्या पाहता, त्यात बरीच तफावत आढळते. वृक्षारोपणाचे केवळ सोपस्कार पार पाडले जाते, अशा तक्रारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी केल्या. त्यामुळे प्रभागात कोणत्या आळीत, कोणत्या चौकात, ठिकाणी रोप लावले आहे. याची स्थानिक नगरसेवकाला माहिती द्यावी. प्रभागातील दोन नगरसेवकांच्या सह्या घ्यावात, असा ठराव समितीच्या सभेत करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक शुक्रवारी झाली. समितीचे कार्याध्यक्ष प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, सदस्य भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, शीतल शिंदे, विलास मडिगेरी, तुषार हिंगे, संतोष लोंढे, नवनाथ जगताप, साधना मळेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. यंदा 60 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये रस्त्याचे कडेने, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, पाण्याच्या टाकीच्या कडेने, धार्मिक ठिकाणी, मंडई इत्यादी ठिकाणी 12 हजार 303 रोपे, विकसित उद्याने, विकसनशील उद्याने 5205, रेल्वेलाईनच्या कडेने मेट्रोमार्फत चार हजार, मिलिटरी हद्दीमध्ये 30 हजार, रोपवाटीकेमधून विक्री व वाटप 6492, हाऊसिंग सोसायटी दोन हजार अशी 60 हजार रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यावर आज झालेल्या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नियोजन करून रोपांची लागवड
बैठकीतील माहिती देताना नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. ग्लोबल वार्मिंगचे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी वृक्षारोपण करण्याची अतिशय गरज आहे. महापालिकेत नेहमीच वृक्ष प्राधिकरण समितीला दुय्यम स्थान दिले जाते. परंपरेप्रमाणे केवळ रोपे खरेदी केली जातात. रोपांची लागवड केली जाते. पंरतु, त्याची फलनिष्पती होताना दिसत नाही. गेल्या 25 वर्षातील रोपे खरेदीची संख्या आणि लागवडीची संख्या पाहता. त्यात बरीच तफावत आढळते. त्यामुळे यंदा नियोजन करुन रोपांची लागवड केली जाणार आहे.
डीपी रस्ता ताब्यात आला की वृक्षलागवडीचे नियोजन केले जाणार आहे. वृक्षलागवड झाली की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. वृक्षलागवड कोठे-कोठे करु शकतो याचे सर्वेक्षण केले जाईल. यावर तज्ज्ञांची मते, सूचना विचारात घेऊन आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. रोपांचे संगोपन करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे रोपांच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (दि.28 रोजी) अॅटो क्लस्टर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला वृक्षमित्र, पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहनही भोईर यांनी केले.
पावसाळा दहा दिवसावर आल्यानंतर पालिका आता उद्यानाची पाहणी करणार आहे. उद्यानात काही त्रुटी आहेत. झाडे मोडकळीस आली आहेत का, जिवीतास धोका होऊ शकते अशी झाडे किती आहेत. वर्दळीच्या ठिकाणाची दुरवस्था झाली आहे का, याची पाहणी केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाच्या पुढच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या आहेत.