पुणे । ऑटोमोबाईल -उद्योग क्षेत्रातील कठीण कामे, शहर नियोजन, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचा अभ्यास, सीमेवरील प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी संरक्षण, शेतीतील घटक आणि पिकांच्या वाढीचा अभ्यास, अंतराळ मोहिमा, वैद्यकीय क्षेत्रातील किचकट शस्त्रक्रिया या सगळ्यात आज रोबो तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जात आहे. सध्या रोबो तत्रंज्ञानात मानवनिर्मित बुद्धिमत्ता विकसनावर संशोधन सुरू असून, भविष्यात रोबो तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात क्रांती घडवेल, असा आशावाद फ्ल्युईड रोबोटिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम भालेराव यांनी व्यक्त केला.
‘रोबोटिक्स : काल, आज आणि उद्या’
मराठी विज्ञान परिषद, पुणे, मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या सभागृहात आयोजित ‘रोबोटिक्स : काल, आज आणि उद्या’ या विषयावर भालेराव बोलत होते. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, एमकेसीएलचे उदय पांचपोर, विज्ञानशोधिकेचे संचालक अनंत भिडे, सहसंचालिका नेहा निरगुडकर आदी उपस्थित होते. बारा व्याख्यानांची ही मालिका आयोजित केली असून, त्यातील हे पहिले व्याख्यान होते.
अनेक अवजड कामे रोबोमुळे
भालेराव म्हणाले की, आज रोबो तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्या गोष्टी मानवाला शक्य नाहीत, त्या होऊ लागल्या आहेत. मानवी जीवनाचा दर्जा उंचावत आहे. स्वयंचलित गाड्यांची निर्मिती होऊ लागली आहे. उद्योगात अनेक अवजड कामे रोबो करीत आहे. उत्पादन क्षमता, अचूकता वाढत आहे. परंतु, याला काही मर्यादा आहेत. ज्ञानेंद्रिय विकसित नसल्याने सध्याचे रोबो तंत्रज्ञान मानवी सूचनांवर अवलंबून आहे. रोबो तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात नोकर्या जातील, मात्र त्याच प्रमाणात नव्या नोकर्यांचीही निर्मिती होईल. शिक्षण क्षेत्रात रोबो तत्रंज्ञान येत आहे. त्यामुळे अभ्यासाच्या पद्धतीही बदलू शकतात. पर्यावरणाच्या रचनेचा सखोल अभ्यास करता येईल. प्रा. घारपुरे म्हणाले की, नवतंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजिली आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मराठी विज्ञान परिषद नियमित विज्ञानप्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.