कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत रोमांचक झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा शेवटच्या चेंडूवर १ गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता असताना आणि या षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर अवघी एक धाव निघाली असताना हरमनप्रीतने शेवटच्या दोन चेंडूंवर आठ धावा फटकावत संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. स्पर्धेच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्याही दडपणाशिवाय विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढले, मात्र ही लढत अतिशय रोमांचक ठरली. दोन्ही संघांची निवड विश्वचषक स्पर्धेसाठी झाली आहे.
दीप्ती शर्मा, मोना मेश्रामने रचला पाया
दिप्ती शर्माने ८९ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी साकारत विजयाचा पाया रचला मात्र या सामन्याची खरी हिरो ठरली ती हरमनप्रीत. शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता असताना आणि या षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर अवघी एक धाव निघाली असताना हरमनप्रीतने शेवटच्या दोन चेंडूंवर आठ धावा फटकावत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. आफ्रिकेच्या २४५ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून मोना मेश्रामने जबाबदार अर्धशतकी खेळी केली. मोना मेश्रामने ८२ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावरील दिप्ती शर्माने ८९ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी साकारली. ४३ व्या षटकानंतर भारतीय संघ ४ बाद २०९ अशा सुस्थितीत होता. मात्र यानंतर भारतीय संघाने अवघ्या १४ धावांमध्ये ४ फलंदाज गमावले.
लक्ष्य गाठताना चांगलीच दमछाक
सुपर सिक्सची एक फेरी शिल्लक असतानाच भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. भारतीय महिला संघ विश्वचषक पात्रता फेरीच्या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा हा स्पर्धेतील पहिला पराभव आहे. भारताने रोमांचक विजय मिळवलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २४४ धावा केल्या. हे लक्ष्य गाठताना भारतीय संघाची चांगलीच दमछाक झाली. दक्षिण आफ्रिकेकडून एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी ३० ते ४० धावा केल्या. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने तीन तर शिखा पांडेने दोघांना बाद केले. या मालिकेत कर्णधार मितालीसह महाराष्ट्राची मोना मेश्राम, दीप्ती शर्मा यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली.
श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघदेखील महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे संघ विश्वचषक स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीच्या गुणतालिकेत भारतीय महिला अव्वल स्थानी राहिल्या, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले. दहा संघांच्या या स्पर्धेत या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तसेच, या स्पर्धेतील अव्वल चार संघांनी केवळ विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला असून आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्याचप्रमाणे, बांगलादेश आणि आयर्लंड यांनी स्पर्धेत सुपरसिक्स फेरीत धडक मारून पुढील चार वर्षांसाठी आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा कायम राखला आहे.