नवी दिल्ली । दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला रोमांचक लढतीत 4 गडी आणि 1 चेंडू राखत मात दिली. अखेरच्या 4 चेंडूत 9 धावा हव्या असताना सामनावीर मनीष पांडेने षटकार ठोकत संघाला विजयश्री खेचून आणून दिली. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांमध्ये 169 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची अवस्था 3 बाद 21 झाली होती. यानंतर आलेल्या युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांनी 110 धावांची भागीदारी करत संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. पठाणने 39 चेंडूत 59 धावा ठोकल्या. यात दोन षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. पठाण बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने इतर फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. पण मनिष पांडेने दुसरी बाजू लावून धरली आणि सामना अखेरच्या षटकपर्यंत खेचला. मनीषने तीन षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 49 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकात उभा राहिला रोमांच
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मनिष पांडेने मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघासाठी विजय खेचून आणला. अखेरच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 9 धावांची गरज होती. अमित मिश्राने पहिला चेंडू निर्धाव, तर दुसर्याच चेंडूवर ख्रिस वोक्सची विकेट घेत सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. त्यानंतर सुनील नरेनने एक धाव काढून मनिष पांडेला स्ट्राईक दिली.
मनिष पांडेने खणखणी षटकार खेचून सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. पुढच्या चेंडूवर कव्हर्समध्ये दोन धावा काढून मनिष पांडेने संघासाठी मॅच विनिंग खेळी साकारली. दिल्लीच्या 169 धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात कोलकाताची सुरूवात निराशाजनक झाली होती. 21 धावांवर कोलकाताचे तीन फलंदाज तंबूत दाखल झाले होते. कर्णधार गौतम गंभीर 14, ग्रांडहोम 1 तर उथप्पा केवळ 4 धावांवर बाद झाल्यामुळे केकेआरची अवस्था 3 बाद 21 अशी झाली होती. यानंतर युसुफ पठाणने आक्रमक खेळी करत संघाचा धावफलक उंचावला. तर सुरुवातीला संथ खेळी करणार्या मनीष पांडेने शेवटी धुवाधार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
ऋषभ पंतची तुफानी खेळी
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांमध्ये 169 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीकडून ऋषभ पंतने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फटकेबाजी केली. पंतने 4 षटकार आणि 2 चौकार लगावत 16 चेंडूत 38 धावांची खेळी केली. सलामीवीर संजू सॅमसन आणि बिलिंग्ज यांनीही चांगली सुरूवात केली होती. सॅमसनने 39 धावांची खेळी केली. यात सात खणखणीत चौकारांचा समावेश होता. तर बिलिंग्जने 21 धावा ठोकल्या. करुण नायर यावेळी धावांसाठी झगडताना दिसला. नायरने 27 चेंडूत 21 धावा केल्या. कुल्टर नायलच्या गोलंदाजीवर तो क्लीनबोल्ड झाला. ख्रिस मॉरिसनेही अखेरच्या दोन षटकांमध्ये तीन चौकार लगावत 9 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी साकारली.