नंदुरबार । आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या के.डी. गावीत इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थ्यांची राष्ट्रीय तर एका विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी के.डी. गावीत संकुलातील अद्ययावत सुविधा, शाळा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व पोषक वातावरणामुळे यश प्राप्त करीत असल्याचे म्हटले जात आहे. के.डी. गावीत इंग्लिश स्कूलमधील तुषार भोये या विद्यार्थ्याने रोलबॉलच्या विभागीय स्पर्धेपाठोपाठ राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याच्या कौशल्याच्या आधारे उत्कृष्ट खेळ दाखविला. त्यामुळे निमच (मध्यप्रदेश) येथे होणार्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात तुषारची निवड करण्यात आली.
अनेक विद्यार्ध्यांचे मोठे यश
कोल्हापूर, पुणे, मुंबई व नागपूर विभागातील खेळाडूंसह नाशिक विभागातून एकमेव तुषार भोयेची निवड करण्यात आली. तर के.डी. गावीत इंग्लिश स्कूलमधीलच नयना कुवर या विद्यार्थिनीनेदेखील विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अपेक्षेपेक्षा चांगला खेळ दाखवीत राज्यस्तरापर्यंत मजल मारली. नयना ही सोलापूर येथे होत असलेल्या राज्य स्पर्धेत सहभागी झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे के. डी. गावीत शैक्षणिक संकुलाच्या स्पर्धांमधील योगदानात भर पडली आहे. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, कार्यालयीन अधीक्षक भीमसिंग वळवी, प्राचार्य पी.बी.पाटील यांनी कौतुक केले असून दोघांना क्रीडा शिक्षक योगेश पाडवी, अविनाश वसावे यांचे मार्गदर्शन लाभले.