रोहित्र जळाल्याने केळी पीक संकटात

0

सुकळीच्या शेतकर्‍यांचा संताप ; वीज कंपनी अधिकारी धारेवर

मुक्ताईनगर- तालुक्यातील सुकळी येथील रणरणत्या उन्हाळ्यात केळी पिकाला पाण्याची नितांत गरज असताना गेल्या 11 दिवसापांसून रोहित्र जळाल्याने परीसरातील केळी पीक संकटात सापडल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीचे मुक्ताईनगर सबस्टेशन गाठत तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही अता आत्महत्या करायची का ? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. या शेतकर्‍यांमध्ये भाजपचे पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांचाही समावेश होता. शेतकर्‍यांनी दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी करीत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना काळे फासण्यापूर्वीच अधिकार्‍यानी तत्काळ रोहित्र बसविण्याचे आदेश केल्याने शेतकर्‍यानी मवाळ भूमिका घेत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता व्ही.पी.खाचणे यांना लेखी निवेदन दिले.

दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार
शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सुकळी शेत शिवारातील रोहित्र क्र 368 हे 4 मे रोजी जळाले. या दरम्यान संबधीत वायरमन यांना व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनीवरून वेळोवेळी तक्रारी करूनदेखील राधे रोहित्र फेल झाल्याचा रीपोर्टदेखील कार्यालयात सादर केला नाही. संबधीत लाईनमन, वायरमन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. संबधीत रोहित्र पुरवणार्‍या ठेकेदाराची देखील मनमानी सुरू असून रोख पाच ते सात हजार देणार्‍यास तत्काळ रोहित्र बसवून मिळते, असा आरोप शेतकर्‍यांनी करीत या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. वीज कंपनी प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, संजय पाटील, विश्वास पाटील, महारु पाटील, मनकर्णाबाई पाटील, महेंद्र पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.