रोहित आणि पार्थ पवारांबाबतच्या वायफळ चर्चांची होळी

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पार्थ पवार यांना जाहीर केली. त्यानंतर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी आजोबांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केल्याने पार्थ आणि रोहित पवार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु, दोघा भावांनी एकत्र येत त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या वायफळ चर्चेचे काल होळीनिमित्त दहन केले..

पिंपरी, संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहित यांनी होळीचे पूजन केले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, श्याम लांडे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या मावळ मतदार संघातील उमेदवारीवरुन पवार कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. परंतु, प्रत्यक्षात पार्थ यांची उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. त्यानंतर काल होळीनिमित्त पार्थ आणि रोहित पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्याबद्दलच्या वायफळ चर्चेचे दहन केले.